पोलीसाना हवा गुटखा, चोरट्यांचा सर्वसामान्यांना झटका; आयुक्तांची ४० पथके फेल... शहरात चैनस्नॅचिंग, लूटमार, दुचाकीचोरी सुरूच

Foto
औरंगाबाद : शहरातील  गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी पोलीस आयुक्तांनी चाळीस विशेष पथकांची स्थापना केली होती. या पथकाच्या तैनाती नंतरही मंगळसूत्र हिसकावणे, लूटमार सुरूच असल्याने ४० पथके फेल झाल्याची चर्चा रंगत असून पोलिसांना हवा गुटखा आणि चोरटे देत आहेत सर्वसामान्यांना झटका अशीच काही परिस्थिती शहरात दिसत आहे

लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या मध्यरात्री चिश्तीयाचौक परिसरातील एका मंदिराची विटंबना झाल्याचा प्रकार समोर आला होता. तर अनेक ठिकाणी घरफोडी, दुचाकीचोरी, लूटमार अशा घटनांत वाढ होत असल्याने पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी गुन्हेशाखा, विशेष शाखासह स्थानिक पोलीस अशा ४० विशेष पथके तैनात केली होती. ही पथके दिवस-रात्र गस्त घालून धार्मिक स्थळे तपासणे, गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे,  तसेच संशयितरित्या फिरणार्यावर लक्ष ठेवणे, लूटमार, दुचाकीचोरी आणि मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्यातिल आरोपींचा माग काढणे यासाठी तैनात करण्यात आली आहे. आयुक्तांच्या या कृतीचा काही प्रमाणात फरकही पडला.   अनेक संशयित पोलिसांनी अटक केली मात्र, मंगळसूत्र चोरी, दुचाकी चोरी, आणि लूटमार काही थांबलेली दिसत नाही.  कारण, दोन दिवसांपूर्वीच मुकुंदवाडी भागात रस्त्याने जाणाऱ्या एका महिलेचे गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यानी लंपास केले   तर एका तरुणाला मारहाण करून जबरदस्तीने त्याचे पैसे व  ऐवज लुटण्यात आले. चाळीस पथके तैनात करूनदेखील शहरातील गुन्हेगारी सुरूच असल्याने ही पथके करतात तरी काय? मोठ्या आत्मविश्वासाने तैनात करण्यात आलेली ही पथके फेल तर झाली नाही ना? असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडत आहे.